‘मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे’; अजित पवारांचे थेट शरद पवारांना आव्हान?
मुंबई : अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाकडून आमच्या बाजूने निर्णय लागेल असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे आम्ही याचिकेत सांगितलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात योग्य तो निर्णय होईल, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरेंनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता त्यावर, मला माझ्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळे मी आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा – राज्यभरात पावसाचे होणार पुनरागमन; हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट
छगन भुजबळांनी बीडमधील सभेत थेट शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. यावरून विचारलं असता. आपण भुजबळांचं सभेतलं भाषण व्यवस्थित ऐकलंच नाही, असं अजित पवार म्हणाले.
सोशल मीडियावर बघत असताना काही बातम्या मला वाचायला मिळाल्या. माझं मत आहे की राजकीय जीवनात काम करत असताना आपण आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडायला हवी. ते करत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत ही काळजी घेतली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.