breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता अजितदादांची; हवा रोहीतदादांची!

प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचे नव्या दादांना ‘रेड कार्पेट’

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्यात आमदार रोहित पवार यांनी देखील सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आपल्या विचारांचा गट तयार करण्याबरोबर शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी देखील आमदार पवार पाठपुरावा करताना दिसत आहेत. या पूर्वी भाजपाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गडाला सुरुंग लावत महापालिका ताब्यात घेण्याचे काम केले आहे. आता आमदार रोहित पवार देखील उपमुख्यमंत्री पवार यांना शह देण्यासाठी शहरात उतरले असल्याने राजकीय रंगत पहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शहरात मोठा जनसंपर्क आणि दरारा आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्वच माजी नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारी त्यांच्या हातात हात घालून पुढे राजकीय वाटचाल करत आहेत. यावरून शहराच्या राजकारणात मोठ्या साहेबांचा न्हवे तर अजित दादांचाच बोलबाला असल्याचा संदेश दाखविण्याचा प्रयत्न अजित दादा समर्थकांनी केला. मात्र खासदार शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे आव्हान आमदार रोहित पवार यांनी दिले. शहराध्यक्ष पदावर तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आमदार रोहित पवार यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. एका बाजूला आपल्या विचारांचे समर्थक निर्माण करण्याबरोबरच दुसरीकडे आपल्या टीकेतून शहरातील प्रस्थापित अजित दादा समर्थक नेत्यांना घायाळ करण्याची खेळी देखील आमदार रोहित पवार करत आहेत.

हेही वाचा – भाजपची मोठी खेळी, राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे, तरुणांना भेटणे, विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर रोहित पवारांचा भर दिसत आहे. केवळ एवढ्यावरच चालणार नसून शहरातील विकासकामांवर बोलावे लागेल यायची जाण असल्याने रोहित पवारांनी आयुक्तांची भेट घेऊन शहरातील प्रश्न मार्गी लावण्याबाबत पुढाकार घेतला आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने राजकीय चर्चांना निमित्त भेटले आहे.

आमदार बनसोडे यांची मध्यस्थी फलदायी पण…

वाकड येथील टीडीआर प्रकरणानंतर आयुक्त सिंह यांच्या बदलीचा विषय रंगला होता. दरम्यानच्या काळात आयुक्त सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित दादांच्या गटाशी जुळवून घेतले. त्यांची बदली थांबविण्यासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची मध्यस्थी फलदायी ठरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावरून सध्या आयुक्त शेखर सिंह यांची बदली होणार नसून ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, हे स्पषट आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत आपली कामे होतील अशी अपेक्षा अजित दादा समर्थकांना आहे. मात्र दुसरीकडे आयुक्तांचा आमदार रोहित पवार यांच्याबाबतचा पॉझिटिव्ह ऍप्रोच देखील अजित दादा समर्थकांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.

आमदार रोहित पवारांसाठी आयुक्तांच्या पायघड्या

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकताच पिंपरी चिंचवड शहरात जनता दरबार आयोजित केला होता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र महापालिकेच्या सभागृहात हा कार्यक्रम घ्यायला महापालिकेने नकारघंटा दिली. मात्र दुसरीकडे आमदार रोहित पवार यांना पायघड्या घातल्याचे दिसले. आमदार पवार यांनी जनतेच्या प्रश्नावर आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. रखडलेली विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. यावर आयुक्तांनी देखील सकारात्मक उत्तरे दिल्याची चर्चा रंगली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button