महायुतीत तिढा कायम, ११ मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक
![Again meeting in Delhi on March 11 regarding seat allocation of Grand Alliance](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Eknath-Shinde-Devendra-Fadnavis-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. येत्या ११ मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत.
महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. अमित शाह यांच्यासोबत काल शिंदे, फडणीस, अजित पवार यांच्यात तब्बल २ तास खलबतं झाली. पण काल झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. ३ ते ४ जागांवर तिढा कायम आहे. रामटेक, वाशिम-यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागेवर अद्यापही तिढा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
हेही वाचा – उन्हाळ्यात या पिकांची लागवड करा आणि चांगले पैसे कमवा!
दिल्लीच्या कालच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील, अशी परिस्थिती नाहीय. पण मी हे म्हणू शकतो की, आमचं काम ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेलं आहे. २० टक्क्याचं काम राहीलं आहे. आमच्यात चर्चा सुरु आहे. याबाबत फोनवर संभाषण झालं तरी चर्चा होते. आमच्यात आपापसात सध्या चर्चा सुरु आहे. आमचे जे काही थोडेफार विषय राहीले आहेत त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ’, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत ३५ पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. महायुतीच्या आतापर्यंत झालेल्या जागावाटपानुसार, अजित पवार गटाला ४ तर शिंदे गटाला १० जागा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.