महाराष्ट्राला मिळाले आणखी एक ‘भावी मुख्यमंत्री’, राजकीय चर्चांना उधाण!
![Aditya Thackeray's banner of the future Chief Minister was raised in Nagpur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/aditya-thackeray-1-780x470.jpg)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘भावी मुख्यमंत्री’ चे बॅनर मोठ्या प्रमाणावर झळकत आहेत. काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे बॅनर दिसून आले होते. दरम्यान आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाण उधाण आलं आहे.
आदित्य ठाकरे आज पासून नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रदुषित गावांची पाहणी करणार असून येथील स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – भारतातील सर्वात लांब रुटची ट्रेन कोणती? किती तासांचा आहे प्रवास?
नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर दिला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. या बॅनर वर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही या पोस्टर्सवर फोटो आहेत.