अभिजीत बिचुकलेंना कसबा पोटनिवडणुकीत मिळाली ‘इतकी’ मतं
![Abhijit Bichukale got 48 votes in the Kasba by-election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/abhijit-bichukale-780x470.jpg)
कसब्यात सर्व अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं
पुणे : गेल्या महिन्यापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं होतं. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा १० हजार मतांनी पराभव केला आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखले केलेल्या अभिजीत बिचुकलेंना पराभव पत्कारावा लागला आहे. महत्वाचे म्हणजे बिचुकलेंना केवळ ४८ मतं मिळाली आहेत. पहिल्या फेरीत बिचुकलेंना केवळ चार मते मिळाली होती. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत त्यांना शून्य मतं मिळाली आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांचीही जोरदार चर्चा होती. बिचुकलेंनी कसब्यात जोरदार प्रचार केला होता. बिचुकलेंना मतांची हाफ सेंच्युरीही पूर्ण करता आलेली नाही. त्यांना पोटनिवडणुकीसाठी कपाट हे चिन्ह मिळालं होतं.
दरम्यान, अभिजीत बिचुकलेंबरोबर ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष असलेल्या आनंद दवे यांचीही कसब्यात चांगलीच चर्चा होती. मात्र त्यांनाही २९६ मतांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे इतर सर्व अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं मिळाली आहेत. नोटाला एकूण १ हजार ३९७ मतं मिळाली आहेत.