गुरुद्वाराबाहेर थरार! पंजाबमध्ये ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या

AAP Leader Lucky Oberoi Murder | पंजाबमधील आम आदमी पक्ष (आप)चे पदाधिकारी लकी ओबेरॉय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जालंधर शहरातील पॉश मॉडेल टाऊन भागातील एका गुरुद्वाराबाहेर शुक्रवारी (६ फेब्रुवारी) पहाटे ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ओबेरॉय गुरुद्वारातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या ‘थार’ गाडीत बसत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
https://x.com/ANI/status/2019635143242375264
हेही वाचा : रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; आरबीआयकडून पतधोरण जाहीर
क्लोज रेंजवरून टार्गेट
प्राथमिक तपासात दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते, अशी माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे ७.५५ वाजता कारमध्ये बसल्यानंतर जवळून गोळीबार करण्यात आला. ओबेरॉय यांच्या पत्नी सीमरज्योत कौर यांनी गेल्या वर्षी ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
८ ते ९ राऊंड फायर
“लकी ओबेरॉय यांना सकाळी ८ वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर ८ ते ९ राऊंड फायर झाले होते. सुरुवातीला सीपीआर देण्यात आला, त्यानंतर वेंटिलेटरवर ठेवण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला,” अशी माहिती श्रीराम रुग्णालयाचे डॉक्टर विशाल यांनी दिली.
दरम्यान, घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.




