‘आप’मध्ये अंतर्गत राजकारण? खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेत बोलण्यास बंदी

MP Raghav Chadha | राज्यसभेचे खासदार पती राघव चड्ढा यांनी गेल्या काही काळात संसदेत अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. ब्लिंकिट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडताना त्यांनी गिग कामगारांचा संघर्ष समोर आणला होता. तसेच काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना माघारी बोलावण्याचा अधिकार, विवाहित जोडप्यांना एकत्रित कर भरण्याचा अधिकार अशा विविध विषयांवर त्यांनी आवाज उठवला होता. मात्र आता आम आदमी पक्षामधील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना राज्यसभेत बोलण्यापासून मज्जाव करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र पाठवून खासदार अशोक मित्तल यांची सभागृह उपनेत्यापदी नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. या प्रक्रियेत राघव चड्ढा यांना या पदावरून बाजूला करण्यात आले असून त्यांना सभागृहात भाषणासाठी वेळ देऊ नये, अशी विनंतीही पत्रात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा : ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; प्रभु श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर
स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळले
गेल्या आठवड्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही राघव चड्ढा यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे पक्षात त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पक्षाच्या धोरणांपासून दूर गेल्याची चर्चा
अलीकडच्या काळात राघव चड्ढा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर मौन बाळगल्याचे दिसून आले. तसेच २०२५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी स्वतःला पक्षाच्या धोरणांपासून काहीसे दूर ठेवले आणि सामाजिक विषयांना अधिक प्राधान्य दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





