मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा विक्रम! गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित
४०,००० हुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचले प्राण
![A record of Chief Minister Medical Aid Fund Chamber, disbursed financial assistance of over 321 crores in the last 2 years and 2 months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Mukhyamantri-Sahayata-Nidhi-780x470.jpg)
मुंबई | मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने गेल्या २ वर्षं २ महिन्यात ३२१ कोटींहून अर्थसहाय्य वितरित करुन तब्बल ४० हजाराहुन अधिक गंभीर रुग्णांचे वाचविण्याचा विक्रम केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये, या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कक्षाचे काम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून मु.वै.स.क. मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २९२ कोटींपेक्षा अधिक तर मु.वै.स.क.,नागपूर कार्यालय मधून २८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळवणे सोपे होण्यासाठी कक्षातर्फे विशेष पाऊले उचलण्यात येत आहेत. आता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहीलेली नाही. सहायता कक्षाच्या 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट मोबाईलवर अर्ज उपलब्ध करुन दिला जात आहे.
तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत (empanel) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे. याबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त रुग्णालये या योजनेत जोडण्यात येत आहे.
हेही वाचा – जयंत पाटलांच्या विधानावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश करण्यात आला आहे.
दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले आहे.
अवघ्या एक वर्षाची दुवा बनली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची ब्रॅण्ड अँबेसडर
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फहरीण मकुबाई आणि सादिक मकूबाई या मुस्लिम दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या अवघ्या १३ दिवसांच्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या लाखमोलाच्या मदतीमुळे वाचले होते.