दुःखद! मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
लखनऊ: मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टोंडन यांचे आज सकाळी लखनऊच्या मेदांता रुग्णालयात निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. उत्तर प्रदेश सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि मुलगा आशुतोष टंडन ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लालजी टंडन यांच्यावर सुमारे दीड महिन्यांपासून मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मूत्रपिंड आणि यकृताच्या समस्येमुळे त्यांना दीड महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. टंडन यांना 11 जून रोजी श्वास घेण्यास त्रास आणि ताप यामुळे रुग्णालयात दाखल केले होते.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यावर टंडन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे याआधीच मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मूळचे उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले टंडन अनेक वेळा राज्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मतदारसंघ लखनऊची कमान देखील सांभाळली होती. वाजपेयी यांच्या निधनानंतर लखनऊमधूनच ते 15 व्या लोकसभेवरही निवडून आले होते.