तलवार, कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी चिंचवड | बेकायदेशीरपणे तलवार आणि कोयता बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पानसरे कॉलनी, थेरगाव येथे गुरुवारी (दि. 26) सायंकाळी करण्यात आली.ऋतिक रवींद्र शेलार (वय 21, रा. बोरडेनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक मोहम्मद गौस रफिक नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी एक तरुण पानसरे कॉलनी, थेरगाव येथे थांबला असून त्याच्याकडे शस्त्र आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली आणि ऋतिक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक दुधारी तलवार आणि एक कोयता मिळून आला. पोलिसांनी ही हत्यारे जप्त करत त्याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.