breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिवाळी अधिवेशन पिंपरी-चिंचवडकरांसाठी ‘फलदायी’

आमदार महेश लांडगे यांनी विधीमंडळ सभागृह गाजवले

मराठा आरक्षण, इंद्रायणी प्रदूषणसह विविध प्रश्नांचा ‘लक्षवेध’

पिंपरी : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील उपयोगकर्ता शुल्क, इंद्रायणी-पवना नदी प्रदूषण, भूसंपादन प्रक्रिया, बर्न हॉस्पिटल अशा विविध मुद्यांवर आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. या मुद्यांवर सभागृहात सकारात्मक चर्चा झाली.

राज्य विधीमंडळाच्या दहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. त्यात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न आणि मुद्यांवर घमासान चर्चा झाली. राज्यातील परिस्थितीमध्ये झालेला बदल आणि महापालिकेतील प्रशासकीय राजवट यामुळे विविध मुद्यांवर जोरदार चर्चा झाली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पिंपरी-चिंचवडकरांसाठी फलदायी ठरले आहे. शहरातील १० ते १२ विषयांवर लक्षवेधी चर्चा, तारांकीत प्रश्न, औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, दहा दिवसांच्या अधिवेशनामध्ये काही प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यावर आगामी अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे यांनी उपयोगकर्ता शुल्क वसुली रद्द करण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आली. इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणावरही सभागृहात सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारच्या अमृत- २ योजनेमध्ये या नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला.

हेही वाचा – मोठी बातमी! राज्यातील लोकसभेच्या २३ जागांवर ठाकरे गटाचा दावा

भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांच्या जाळे निर्माण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेचा अडसर होत आहे, असा दावा आमदार लांडगे यांनी सभागृहात केला. त्यावरही राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी भूसंपादन प्रक्रिया सुलभ करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कचरा प्रश्नावर उपाययोजनांची मागणी…

स्थानिक नागरिकांचा विरोध आणि नागरिकरण याचा विचार करुन पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचे स्वागत करीत आमदार लांडगे यांनी देहू कँन्टोंन्मेट हद्दीतील कचरा रुपीनगर-तळवडे हद्दीलगत जाळला जातो. कॅन्टोमेंट हद्दीत कचरा डेपो नाही. तसेच, श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याबाबतही आमदार लांडगे यांनी सभागृहात मागणी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भावस्पर्शी भाषण…

राज्यात प्रचंड चर्चेत असलेला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आमदार महेश लांडगे यांनी प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे भाषण केले. लक्षवेधीमध्ये चर्चा करण्यासाठी तीन दिवस प्रतीक्षा आणि रात्री साडेबारा वाजता भाषणाला उभा राहिलेल्या आमदार लांडगे यांनी मराठा आरक्षणावर २२ मिनिटे जोरदार ‘बॅटिंग’ केली. मराठा आरक्षणाची गरज काय? आणि भाजपाची भूमिका काय? या मुद्याला राजकीय वळण न देता आरक्षण द्या…असे मुद्दे त्यांनी समर्पकपणे मांडले. तसेच, गेल्या ६० वर्षांत सत्तेत असलेल्या नेत्यांनी काय केले? असा खडा सवालही उपस्थित केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button