चिखली आणि पिंपरी येथे जबरी चोरीच्या दोन घटना
पिंपरी l प्रतिनिधी
चिखली येथे पादचारी व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावला. तर पिंपरी येथे दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचा गोफ हिसकावला. या प्रकरणी गुरुवारी (दि. 10) चिखली आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेमंत मुगुटराव चव्हाण (वय 43, रा. चिखली प्राधिकरण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चव्हाण हे गुरुवारी सकाळी पावणे सात वाजता स्पाईन रोड चिखली येथून रस्त्याने पायी चालत जात होते. जाधव सरकार चौक येथे आले असता एका मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातून पाच हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.
अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे बुधवारी (दि. 9) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या दोन मुलांसह दुचाकीवर थांबली होती. त्यावेळी स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचा गोफ असा 52 हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक अक्षय कोकाटे तपास करीत आहेत.