वेश्या व्यवसाय प्रकरणी भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल
पिंपरी l प्रतिनिधी
भोसरी आणि दिघी येथे पोलिसांनी छापे मारून वेश्या व्यवसाय प्रकरणी कारवाई केली. त्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 28) भोसरी आणि दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस नाईक धोंडीराम केंद्रे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोषी योगेश मंगावणे (वय 40, रा. कृष्णानगर दिघी), दयानंद वाघमोडे (वय 40, रा. फलटण), विशाखा नागनाथ बागडे (वय 18, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी एका महिलेला जबरदस्तीने पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. त्या महिलेकडून आरोपींनी वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यावर आरोपींनी आपली उपजीविका भागवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विशाखा हिला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील महिला पोलीस नाईक यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रप्रकाश शिवाजीराम माने (वय 35, रा. आळंदी), सचिन अंकुश माझीरे (वय 42, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी आझादचौक च-होली येथे एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालवला. त्यासाठी त्यांनी काही महिलांना पैशांचे आमिष दाखवून प्राप्त केले. याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली असता पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. स्पा मालक चंद्रप्रकाश याला अटक करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.