चिंचवड, चिखलीमध्ये दोन घरफोड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/burglary-gharfod.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
बिजलीनगर येथील रेल विहार सोसायटीमध्ये अज्ञात चोरटयांनी भर दिवसा चोरी करून सव्वालाखाचे दागिने आणि एक दुचाकी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 23) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजताच्या कालावधीत घडली. एका महिलेने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बुधवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दिवसभराच्या कालावधीत अज्ञात चोरटयांनी घराच्या किचनच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि घरासमोर पार्क केलेली 15 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करीत आहेत.
चिखलीत 47 हजारांची घरफोडी
चिखली परिसरातील बालगरे वस्ती येथील एका घरात चोरटयांनी चोरी करून 47 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 4 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी राजुराम जीवराम देवासी (वय 25, रा. बालगरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक तपास करीत आहेत.