निगडी, तळेगाव एमआयडीसी मध्ये दोन घरफोड्या : तीन लाखांचा ऐवज चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या. याप्रकरणी रविवारी (दि. 17) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांमध्ये दोन लाख 98 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
निगडी पोलीस ठाण्यात ठाण्यात तन्मय उमेश कुलकर्णी (वय 29, रा. प्राधिकरण निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पत्नीसह त्यांच्या घराला कुलूप लाऊन गेले असता रूमच्या एक्झोस्ट खिडकीतून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 86 हजारांचे दागिने, म्युजिक सिस्टम, लॅपटॉप आणि आयपॉड चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.
संदीप भारत शेंडे (वय 35, रा. इंदोरी, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राहत असलेल्या खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने पाच तोळे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे 2 लाख 12 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.