तळवडे अपघातातील जखमी राधा वर्मा यांच्या जुळ्या बाळांचा मृत्यू
जखमी राधा वर्मा यांची प्रकृती गंभीर

वर्मा कुटुंबावर काळाचा घाला; परिसरात हळहळ
पिंपरी चिंचवड : आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर घरात बोबडे बोल बोलणारे बाळ येणार म्हणून आनंदात असणाऱ्या वर्मा कुटुंबाच्या स्वप्नांचा चक्काचूर एका क्षणात झाला. तळवडे-निगडी रोडवरील म्हसोबा मंदिरासमोरील मंगळवार (ता. ९) दुपार वर्मा कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचे वादळ घेऊन आली. पीएमपीच्या ई-बसने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी असलेल्या राधा वर्मा यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा पोटातच अंत झाला. तर राधा वर्मा यांची परिस्थिति गंभीर आहे. यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ म्हसोबा मंदिरासमोर मंगळवारी (ता.९) दुपारी दीडच्या सुमारास पीएमपीच्या ई-बसने धडक दिल्याने सुधा बिहारीलाल वर्मा हिचा (वय- ९ वर्ष, रा. उत्तरप्रदेश) मृत्यू झाला. तर, राधा राम वर्मा (वय २२, सध्या रा. साई गार्डनजवळ, तळवडे; मूळ रा. उत्तरप्रदेश) या गंभीर जखमी झाल्या. राधा आणि सुधा या दोघी बहिणी होत्या. राधाच्या बाळंतपणाला मदतीसाठी बहीण आली होती. तर कामानिमित्त उत्तर प्रदेशातून आलेले राम आणि राधा वर्मा हे दाम्पत्य तळवडे येथे मागील आठ वर्षांपासून वास्तव्याला होते. एका खासगी कंपनीत ते ‘हेल्पर’ होते.
हेही वाचा – एकजूट, समर्पण अन् लोकसंपर्कातून भाजपाचा विजय निश्चित!
अनेक वर्षे वैद्यकीय उपचार घेत असतानाच बाळाची गोड बातमी त्यांना समजली. त्यामुळे हे कुटूंब आनंदात होते. हे जुळे असल्याचे तपासणी वेळी समजले आणि दोघांच्याही आनंदाला सीमा राहिली नाही. आता या अपघातानंतर राम यांचे सर्वस्व नियतीने हिरावून घेतले. या अपघातात राधाने मातृत्व गमावले आहे. राम यांचे पिता होण्याचे स्वप्न देखील आधुरे राहिले.




