बीजेनिमित्त तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत ‘तुकोबां’चा जागर!
वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव; भंडारा डोंगरावर

९ मार्चपासून अमृतमहोत्सव सोहळा
पिंपरी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
श्री जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी हा मान पुणे जिल्ह्यास दिला आहे. श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद आणि हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली.
श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने गाथा पारायण सोहळा येत्या ९ मार्च ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होईल. या पारायण सोहळ्यासाछी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार असून मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जवळपास १०० एकर जागेवर हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यामध्ये दररोज ५००० गाथा वाचक सहभागी होतील. रोज १००० टाळकरी असतील. २५ मृदंगवादकांचा समावेश असेल.
येत्या ९ मार्च पासून हा सोहळा सुरू होणार आहे. रोज सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता कीर्तन होईल.
हेही वाचा – चिखली तळवडेतील अतिक्रमणांवर फिरला बुलडोझर
बीजेला प्रसादासाठी तीन लाख मांडे तयार करणार
तुकाराम बीजेच्या दिवशी (१६ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली. तुकाराम बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे केले जाणार आहेत. मुळशीतील विविध गावांमधून पाच लाख पुरणपोळीचा प्रसाद दिला जाणार आहे. एक लाख भाकरी आणि विविध भागांमध्ये केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची आमटी येथे अन्नदानात उपलब्ध असेल. बीजेच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत वैकुंठ स्थानक, तुकाराम महाराजांचा वाडा, संस्थान देहू, भंडारा डोंगर संस्थान, भामचंद्र डोंगर, येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





