गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वृक्षदिंडी व वारी सोहळा उत्साहात
शिक्षण विश्व: चिमुकल्यांनी उभं केलं पंढरीसारखं भक्तीमय वातावरण

पिंपरी-चिंचवड : गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल, फेज २ येथे वृक्षदिंडी व वारी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील पंढरपूर वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सांस्कृतिक शिक्षणाचाही एक महत्त्वाचा भाग आहे. ही परंपरा विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेचे अध्यक्ष विनायक भोंगाळे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली सकाळी ९ वाजता पालखी व वृक्षदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. दिंडीने गायत्री स्कूल ते शिवमंदिर असा मार्ग घेतला. मार्गामध्ये चिमुकल्या वारकऱ्यांनी टाळ, मृदंगाच्या तालावर नृत्य, फुगडी आणि भारुड सादर करत पारंपरिक वारीचा आनंद घेतला.
हेही वाचा – “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” महापालिकेची डेंग्यू मलेरियाच्या नायनाटासाठी जनजागृती मोहीम
या कार्यक्रमाला संस्था सचिव संजय भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, तसेच गंधर्वनगरी आणि फेज २ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी आणि वृक्षदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी विशेष कौतुक केले.
परिसर भक्तीमय…
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पारंपरिक रिंगण घालण्यात आले आणि तिथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक गजर व गायन सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवमंदिर परिसरात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेचे संस्कृत शिक्षक आचार्य दीपक शिंदे सर यांनी कीर्तन सादर केले. त्यांच्या भजन व कीर्तनातून पंढरीच्या वारीचे वर्णन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.