गणेशोत्सवानिमित्त कोकणवासी पिंपरी-चिंचवडकरांसाठी ‘प्रवास सेवा’
भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विधायक पुढाकार : पहिल्या दिवशी पाच एसटी बस कोकणात झाल्या रवाना
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवास सेवा सुलभ व्हावी. या करिता एसटी बस सुविधा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी पाच बस कोकणात रवाना झाल्या. या उपक्रमाचे कोकणवासीयांनी कौतूक केले आहे.
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाकाराने गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील कोकणवासीयांसाठी एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या. गेल्या महिनाभरापासून त्याचे ‘बुकिंग’ सुरू होते. बुधवारी सायंकाळी पहिल्या ५ बसनी कोकणात प्रस्थान केले.
यावेळी आमदार महेश लांडगे, विजय परब, विलास गवस, सुधाकर धुरी, अमित महाडिक, सुनील साळुंखे, संदीप साळुंखे यांच्यासह सर्व सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथील मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – Pune | गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस दारूबंदी
यावेळी चिखली ते दोडामार्ग, यमुनानगर ते सावंतवाडी, भोसरी ते सावंतवाडी अशा पाच गाड्या प्रवाशांना घेवून रवाना झाल्या. आज पुन्हा २१ नवीन एसटी बस प्रवाशांना घेवून कोकणात जाणार आहेत.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत कोकणमधील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. गणेशोत्सव आणि कोकणाचे अनोखं नाते आहे. कोकणात जाण्यासाठी एसटी बस फूल होतात. नागरिकांना कोकणात जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे भोसरी मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी बस सुविधा सुरु केली आहे. देव-देश अन् धर्मासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे.
एसटीचा संप असतानाही पाच बस रवाना
वास्तविक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बुधवारी बूक केलेल्या पाच बस कोकणात जाणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात मध्यस्थी केली आणि कोकणवासीयांना पूर्वनियोजनाप्रमाणे प्रवास करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. त्यामुळे पाच बस रवाना झाल्या. परिणामी, कोकणवासी चाकरमान्यांचा उत्साह द्विगुणित झाला. भोसरी मतदारसंघातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी जाण्यासाठी ४ सप्टेंबर आणि ५ सप्टेंबर २०२४ रोजी एसटी बस सोडण्यात आल्या आहेत.