सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन
पिंपरी l प्रतिनिधी
सासरच्या लोकांनी विविध कारणांवरून विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 16 जानेवारी रोजी रात्री आठ ते नऊ वाजताच्या कालावधीत चाकण येथे घडली.
मयत महिलेचा भाऊ राहुल साहेबराव जाधव (वय 24, रा. जीवनापूर, पायटंगी तांडा, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी शनिवारी (दि. 29) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर सुभाष पवार, सुभाष गंपू पवार, तुकाराम सुभाष पवार आणि एक महिला (सर्व रा. चाकण. मूळ रा. लोणी तांडा, ता. पाथरी, जि. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सासरच्या लोकांनी फिर्यादी यांच्या बहिणीला अपमानजनक वागणूक दिली. शिवीगाळ, दमदाटी करून नेहमी घरखर्चासाठी पैशांची मागणी केली. घरातून हाकलून लावून मारहाण करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. सासरच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे तपास करीत आहेत.