सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाची आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Suicide.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पत्नी तिच्या दोन्ही मुलांसह पतीला न सांगता माहेरी निघून गेली. माहेरच्या लोकांनी तिला लपवुन ठेवले आणि जावयाला त्रास दिला. ‘माझ्या मुलीला शोधून आण नाहीतर फाशी घे किंवा औषध पिऊन मर’ अशी सासू आणि मेव्हण्याने जावयाला धमकी दिली. त्रासाला कंटाळलेल्या जावयाने चिट्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना ऑक्टोबर 2021 पासून 8 जानेवारी 2022 या कालावधीत सुतारवस्ती माण हिंजवडी येथे घडली.
गणेश नागनाथ चव्हाण असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे. गणेशचे वडील नागनाथ भाऊराव चव्हाण (वय 50, रा. निचपूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 23) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोशनी गणेश चव्हाण (वय 24,) वनिता मोहन पवार (वय 45, रा. पालाईगुडा, पो. गोंडवडसा, ता. माहुर, जि. नांदेड), रुपाली आलोक राठोड (वय 20, रा. मुंबई), आलोक दशरथ राठोड (वय 28, रा. मुंबई), रितेश मोहन पवार (वय 19, रा. पालाईगुडा, पो. गोंडवडसा, ता. माहुर, जि. नांदेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा मयत गणेश याचा आणि आरोपी रोशनी हिचा सन 2013 मध्ये विवाह झाला. मागील दोन वर्षांपासून गणेश आणि रोशनी त्यांच्या दोन मुलांसह सुतारवस्ती माण हिंजवडी येथे राहत होते. गणेश पुणे येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. रोशनीची आई वनिता पवार हिने गणेश कडून जून 2021 मध्ये शेतीच्या पेरणीसाठी एक लाख 30 हजार रुपये घेतले होते. ते पैसे ती चार महिन्यात परत करणार असल्याचे ठरले होते. मात्र तिने वेळेत पैसे परत दिले नाहीत. गणेश याने त्याची सासू वनिता हिला पैसे मागितले असता तिने रोशनीला गणेशच्या विरोधात भडकावले आणि त्यांच्यात भांडण लावले.
आईने भडकावल्यामुळे रोशनीने गणेश सोबत वारंवार भांडण केले आणि फारकत मागितली. याचा गणेशला मनस्ताप होत असे, त्याबाबत त्याने फिर्यादी यांना सांगितले होते. 14 डिसेंबर 2021 रोजी रोशनी दोन्ही मुलांना घेऊन गणेश अथवा सासरच्यांना काहीही न सांगता पुण्यातील घर सोडून मुंबईला तिची आई आणि बहीण यांच्याकडे निघून गेली. गणेशने रोशनीबाबत तिची आई आणि बहीण यांच्याकडे चौकशी केली मात्र त्यांनी रोशनी हरवल्याचे भासवले. आरोपींनी रोशनी आणि तिच्या मुलांना गणेशपासून लपवून ठेवले. दोन्ही मुलांना गणेश सोबत बोलू दिले नाही. सासू वनिता आणि मेव्हणा रितेश या दोघांनी गणेशला ‘माझ्या मुलीला शोधून आण नाहीतर तू फाशी घे किंवा औषध पिऊन मर’ अशी वारंवार धमकी दिली.
गणेश याने 8 जानेवारी 2022 रोजी दुपारी दीड वाजता त्याचा भाऊ दिनेश याला फोन केला. ‘मी खूप त्रासलो आहे. मला त्रास सहन होत नाही. तुझ्याशी माझं शेवटचं बोलणं आहे’ असे म्हणून गणेशने फोन कट केला. त्यानंतर दिनेशने त्याच्या मित्राला गणेशच्या घरी जाऊन समजावून सांगण्यात सांगितले. मित्र सायंकाळी पाच वाजता गणेशच्या घरी गेला. मात्र तोपर्यंत गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गणेश याने आत्महत्येपूर्वी त्याची पत्नी, सासू, मेव्हणा, मेव्हणी आणि तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.