आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’ बळ
मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणानंतर किटचे भव्य वाटप; महिला रोजगारासाठी खंबीर पाठबळ

पिंपरी-चिंचवड | महिला सक्षमीकरण हा केवळ घोषणांचा विषय नसून प्रत्यक्ष कृतीतून घडणारा परिवर्तनाचा प्रवास आहे. एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो, या ठाम विश्वासातून प्रभाग क्रमांक १० मधील ४०० महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने नेणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आमदार अमित गणपत गोरखे यांच्या पुढाकारातून यशस्वीपणे राबविण्यात आला.
प्रभाग क्रमांक १० मध्ये आयोजित ‘मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व किट वाटप’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०० गरजू महिलांना प्रत्यक्ष शिलाई मशीन व आवश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून अनेक कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी दोन मिनिटे मौन पाळून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
माता रमाई जयंतीचे औचित्य
त्याग, समर्पण आणि संघर्षाची मूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ४०० महिलांना स्वावलंबनाचे साधन देणे हीच माता रमाईंच्या विचारांना खरी मानवंदना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. “तुमच्या मेहनतीला आणि कौशल्याला योग्य व्यासपीठ देणे ही माझी जबाबदारी आहे. केवळ शिलाई मशीन वाटप करून आमचे कर्तव्य संपत नाही, तर या माध्यमातून माता-भगिनींच्या हाताला काम मिळावे, कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हाच आमचा खरा उद्देश आहे,” असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले.
यापुढेही महिलांच्या रोजगारासाठी विविध शासकीय योजना तसेच वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा : एनसीसीत महाराष्ट्राच्या लेकीचा दबदबा : ‘बेस्ट कॅडेट’ तनु भानने देशपातळीवर घडवला इतिहास!
मान्यवरांची उपस्थिती…
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधाताई गोरखे, नगरसेविका सुप्रियाताई चांदगुडे, माजी नगरसेविका जयश्रीताई वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमदार अमित गोरखे यांच्यामुळे आम्हाला केवळ कौशल्य मिळाले नाही, तर सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.” कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना व्यासपीठावर किटचे वाटप करण्यात आले. आमदार अमित गोरखे यांच्या या दूरदृष्टीपूर्ण आणि सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत असून, यामुळे ४०० कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
महिलांच्या हाताला काम आणि मनाला आत्मविश्वास मिळाला, तर कुटुंब स्वतः सक्षम होतं. केवळ मदत देणं नव्हे, तर स्वावलंबनाची संधी निर्माण करणं हेच माझं ध्येय आहे. प्रत्येक महिला सन्मानाने स्वतःच्या पायावर उभी राहील, यासाठी मी सातत्याने त्यांच्या पाठीशी उभा राहीन.
– अमित गोरखे, आमदार.





