एनसीसीत महाराष्ट्राच्या लेकीचा दबदबा : ‘बेस्ट कॅडेट’ तनु भानने देशपातळीवर घडवला इतिहास!
पिंपळे सौदागरच्या कन्येचा राष्ट्रीय गौरव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान

पिंपरी-चिंचवड | भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतील Cariappa Parade Ground येथे पार पडलेल्या राष्ट्रीय एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्राच्या कन्येने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंग (सीनियर विंग) मधून देशातील सर्वोच्च ‘बेस्ट कॅडेट’ हा मानाचा किताब पटकावत महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे.
एका दिमाखदार सोहळ्यात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनु भान हिला सुवर्णपदक आणि मानाची केन प्रदान करून गौरविण्यात आले. शिस्त, नेतृत्वगुण, शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत तिने हा सन्मान मिळवला.

हेही वाचा : गृहनिर्माण सोसायट्यांचे ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल: आमदार शंकर जगताप
विशेष म्हणजे तनु भान ही पिंपळे सौदागर येथील रहिवासी असून, तिच्या या यशामुळे केवळ तिच्या प्रभागाचेच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे आणि महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर उज्वल झाले आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी तनु भान आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिचा विशेष सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री काटे म्हणाले की, “तनु भान हिने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर केवळ पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा आणि महाराष्ट्राचा मान देशपातळीवर उंचावला आहे. हे यश केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील मुलींच्या क्षमतेचे आणि देशातील महिलाशक्तीचे तेजस्वी उदाहरण आहे. शिस्त, परिश्रम आणि देशभक्तीच्या बळावर मुली कोणतेही शिखर सर करू शकतात, हा प्रेरणादायी संदेश तनुने संपूर्ण देशाला दिला आहे.” महिलाशक्ती, जिद्द आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरलेली तनु भान आज हजारो तरुणींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. राष्ट्रसेवेच्या क्षेत्रात मुली कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, हे तिने आपल्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. याप्रसंगी श्री विनोद पाटील, तनु भान यांचे कुटुंबीय तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
तनु भानसारख्या कर्तृत्ववान मुलींना पुढे नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व सामाजिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरातील मुलींसाठी शैक्षणिक, क्रीडा आणि राष्ट्रसेवेच्या संधी अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तनुच्या यशातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक मुली देशसेवेच्या प्रवाहात सहभागी व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.




