breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेखसंपादकीय

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा चालवण्याची जबाबदारी आता समर्थकांवर!

दशक्रिया विधीसाठीही जनसागर लोटला

आठवणींचे स्मरण आणि जबाबदारीची जाणीव

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय पटलावर सुमारे ३५ वर्षे आपल्या नेतृत्व कौशल्याने दबदबा निर्माण करणारे ‘दबंग’ आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. या प्रदीर्घ राजकीय-सामाजिक वाटचालीमध्ये जगताप यांनी अनेक नवोदितांना संधी दिली. महापालिकेतील महत्वाच्या पदांची जबाबदारी दिली. त्यामुळे शहराच्या राजकारणात प्रभावशाली आणि निर्णायक ‘जगताप गट’ तयार झाला. हा वैचारिक आणि सामाजिक वारसा आता पुढे चालवण्याची जबबादारी त्यांच्या समर्थकांच्या खांद्यावर आली आहे.

१९८५ पासून पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आमदार जगताप यांनी महापालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी पदे भूषवली आहेत. २०१४ मध्ये शहरातील प्रलंबित प्रश्नांच्या मुद्यावर जगताप यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांची राजकीय ताकद लक्षात आली. जगताप यांच्यासोबत तत्कालीन राष्ट्रवादीतील ३० ते ३५ नगरसेवक भाजपाच्या संपर्कात गेले. पुढे २०१७ मध्ये त्यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. परिणामी, जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी जगताप भाजपाचे शहराध्यक्ष आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार होते.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत असतानाही आमदार जगताप यांचा ‘शब्द’ पक्ष आणि शहराच्या राजकारणात निर्णायक होता. भाजपाच्या सत्ताकाळात जगताप यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना स्थायी समिती सभापती, सत्तारुढ पक्षनेता, उपमहापौर, महापौर अशा मानाच्या पदांवर संधी दिली. अनेकांना विविध समितींचे अध्यक्ष बनवले आणि स्वीकृत सदस्यांमध्येही कार्यकर्त्यांना न्याय दिला. दुर्दैवाने जगताप यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यांना औषोधोपचार आणि बेडरेस्ट घ्यावी लागली. मात्र, शहराच्या राजकारणा जगताप गटाचे वर्चस्व किंचीतही कमी झाले नाही.

प्रकृतीच्या कारणास्तव जगताप यांना विश्रांती घ्यावी लागत होती. त्यामुळेच जगताप यांचे लहान बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्यावर भाजपा पक्षश्रेष्ठींनी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली. गेल्या दोन- अडीच वर्षांच्या काळात शंकर जगताप यांनी मतदार संघातील विविध स्तरांतील लोकांशी संपर्क वाढवला. लोकांची सार्वजनिक कामे मार्गी लावण्यावर भर दिला. ‘‘ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम वनवासात गेले. त्यांचा राज्यकारभार त्यांचा बंधू भरत याने श्रीरामांच्या पादूका सिंहासनावर ठेवून रामराज्य सांभाळले, अगदी तसेच शंकर जगताप यांनी मतदार संघातील विविध कामे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला’’ ही वस्तुस्थिती आहे. दशक्रीया विधीच्या निमित्ताने जगताप बंधूंवरील सर्वसामान्य नागरिकांचे प्रेम पुन्हा एकदा दिसून आले. गेल्या दहा-बारा दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापासून सर्वपक्षीय नेते, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते यांनीही जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. हा जनसागर आणि ही लोकांची गर्दी जगताप यांनी आपल्या कारकीर्दीत जोडलेल्या माणसांची श्रीमंती सिद्ध करते.

आमदार जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू शंकर जगताप आणि त्यांचे कट्टर समर्थकांवर मोठी जबाबदारी आहे. आमदार जगताप यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांचा पुढे चालवायचा आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड शहराचे हित आहे. यासाठी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप आणि जगताप गटाचे लढवय्ये समर्थक दु:खाचा डोंगर पाठवर टाकून एकोप्याने कामाला लागतील आणि निश्चितपणे आपल्या गटाचा दबदबा कायम ठेवतील, अशी अपेक्षा आहे.


रंगबदलू गिरगिटांनी भाऊंचा वारसा सांगू नये…

आमदार जगताप यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेकांना प्रचंड राजकीय ताकद दिली. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर, उपमहापौर विविध समितींचे सभापती बनवले. काही निष्ठावंतांनी जाण राखली. मात्र, काहीही राजकीय सोय बघून सोयीस्कर आपली भूमिका बदलली. आमदार जगताप यांच्या आजारपणाच्या काळात पद-प्रतिष्ठा आणि केवळ आर्थिक स्वार्थासाठी जगताप यांच्याविरोधात बंडाचे दंड थोपाटले. त्यामुळे जगताप गट किंवा पर्यायाने भाजपात मोठी फूट पाडण्याचा डाव काही अल्पसंतुष्टांनी आखला. या कुटकारस्थानांमध्ये पुढच्या रांगेत असलेले काही नेते पुन्हा राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी भाऊंच्या निधनाचे भांडवल करीत हंबरडा फोडण्याचा अभिनय करताना दिसले. भाऊंच्या हयातीत त्यांना राजकीय स्वार्थासाठी त्रास देणाऱ्यांनी भाऊंचा वारसा सांगू नये, असा संतापही जगताप समर्थकांमधून व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button