एका फोनवर सुटणार चिंचवडमधील नागरिकांच्या समस्या!
आमदार शंकर जगताप यांच्याकडून नागरिकांसाठी हेल्पलाईन

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या केवळ एका फोन कॉलवर सोडविण्याचा नवा उपक्रम आमदार शंकर जगताप यांनी हाती घेतला आहे. वन कॉल प्रोब्लेम सोल्व्ह संकल्पना राबवत ‘आपल्या सर्वांची, आपली हेल्पलाईन’ सुरुवात करताना त्यांनी हेल्पलाईन क्रमांक ७५७५९८११११ जाहीर केला.
या हेल्पलाईनद्वारे पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, वीजपुरवठा तसेच शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न नोंदविता येणार असून, संबंधित विभागाशी समन्वय साधून त्वरित कार्यवाही केली जाणार आहे. नोंदविलेल्या तक्रारींवर तातडीने फॉलो-अप घेतला जाईल, अशी माहितीही देण्यात आली.
हेही वाचा : मोशीतील मूर्ती संकलन उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार जगताप म्हणाले, “नागरिकांच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी आहे. लोकांना त्यांच्या छोट्या-मोठ्या अडचणींसाठी कार्यालयीन दारं ठोठावावी लागू नयेत, म्हणून ही हेल्पलाईन सुरू केली आहे. आता फक्त एक कॉलवर प्रत्येक तक्रारीचे निराकरण होईल.”
या उपक्रमामुळे चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार असून, ‘१ कॉल – प्रॉब्लेम सॉल्व्ह’ या ब्रीदवाक्यामुळे नागरिकांना सोयीस्कर व जलद सेवा मिळेल. असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे.




