ढोल-ताशा पथकातील प्रेमप्रकरण पडले महागात; लग्नाचे आमिष दाखवून केला तरुणीवर अत्याचार
![Saraita dies after being beaten by retired police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Crime-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
ढोल-ताशा पथकात झालेल्या प्रेमप्रकरणातून लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रावेत तसेच राजगुरुनगर परिसरात जुलै २०१७ ते २१ मार्च २०२१ या कालावधीत ही घटना घडली आहे. २९ वर्षीय तरुणीने याप्रकरणी मंगळवारी फिर्याद दिली आहे. संदीप मनोहर शिंदे (वय ३७, रा. राजे शिवाजी नगर,) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शिंदे हा विवाहित असून ही बाब त्याने लपवून ठेवली. लग्न झाले असल्याचे तरुणीला सांगितले नाही. तरुणी नोकरी करीत असून, निगडी येथील एका ढोल-ताशा पथकात वादनाच्या सरावासाठी जात होती. त्यावेळी शिंदे व तिची ओळख झाली. तू मला खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्यासोबत मैत्री करण्यास तयार आहे. तुझी इच्छा आहे का? असे विचारून तिचा विश्वास संपादन केला.
तरुणीने मैत्रीस होकार दिला. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून तरुणीला जबरदस्तीने त्याच्या चारचाकी वाहनातून रावेत परिसरातील हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. त्यानंतर मुकाई चौक ते भोंडवे चौक दरम्यान अंधारात त्याची चारचाकी थांबवली. त्यावेळी शिंदे याने तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरात एका फार्म हाऊसवर वारंवार घेऊन गेला. तेथे तिच्या कपाळावर कुंकू लावला. तू माझी बायको आहेस, असे सांगून वेळोवेळी नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी महिलेवर अत्याचार केला.
याप्रकरणी तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन तो गुन्हा देहूरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक विशाल जाधव तपास करीत आहेत.