breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘कानबाई’ उत्सवातून घडले खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन; खान्देश कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने उत्सवाचे आयोजन

पिंपरी | कानबाई उत्सव हा खान्देशातील प्रमुख उत्सव आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आहे. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल सांगत परंपरा पुढे नेण्याचा सल्ला देत असून, ‘कानबाई’ उत्सवातून खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन घडत असते. वडीलधाऱ्यांकडून मिळालेला हा वारसा पुढे नेण्याचे काम पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत सूरू असल्याचा एक खान्देशी म्हणून अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.

खान्देश कानबाई माता उत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने खान्देशातील संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सण पुढील पिढयांसाठी प्रेरणा आणि वारसा अखंडीत ठेवण्यासाठी दोन दिवसीय खान्देश दैवत माय कानबाई माता उत्सवाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी ६ वाजता आहेर गार्डन येथे महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमावेळी खान्देशवासीय समाज बांधवांकडून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, कार्यक्रमाचे संयोजक माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक अभिषेक बारणे, शारदाताई सोनवणे, राजू दूर्गे, शेखर चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, ऍड. गोरक्षनाथ झुळ, अनिल चौधरी, मोहन पटेल, डॉ. प्रशांत पाटील, अजय गुजर, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, मधुकर पगार, अरविंद सैंदाणे, नानाभाऊ माळी, भागवत झोपे, विकास वारके, प्रकाश लोहार, हेमंत पाटील, अशोक वानखेडे, नरेंद्र ब-हाटे, सरलाताई चौधरी, किरण चौधरी, उज्ज्वल चौधरी, डॉ. विजय पाटील, राजू भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा     –      ‘..तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार’; आमदार रवी राणा यांचं वक्तव्य 

जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, महाराष्ट्राला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. राज्यातील प्रत्येक भागात त्या-त्या ठिकाणांनुसार वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आणि वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. राज्याचा महत्त्वाचा भाग असलेला खान्देश देखील आपल्या वेगळ्या परंपरा आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. खान्देशात कानबाई माता उत्सव खानदेशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा आहे. पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेल्या खान्देश वासियांना यानिमित्ताने आपल्या परंपरागत चालत आलेला सांस्कृतिक महोत्सव कानबाई माता उत्सव साजरा करण्यासाठी व एकत्रीत येण्यासाठी सार्वजनिक कानबाई महोत्सवाचे आयोजन प्रशंसनीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या खान्देशी उत्सवाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी केले.

तत्पुर्वी, सुहासिनींच्या हस्ते कानबाई मातेची स्थापना करून रात्रभर अहिराणी भाषेतील लोकगीतांवर नृत्य करत कानबाईची भक्ती करण्यात आली. शनिवारी तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर येथून गहु दळण (सप्ता पुजन) कार्यक्रम, तसेच, रविवारी फुलमाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार करत त्यावर आकर्षक रोषणाई करून माय कानबाई भव्य मिरवणुक तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी ते आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथून काढून, आहेर गार्डन वाल्हेकरवाडी येथे देवीची स्थापना करण्यात आली. प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित खान्देशवासीयांनी कानबाईची आरती केली. तसेच, गायक अशोक वनारसे, गायिका आश्विनी भोंडवे यांच्या मातेचा जागर या सांस्कृतिक कार्यक्रमात तल्लीन झाले. सोमवारी विर्सजन मिरवणुक आहेर गार्डन ते जाधव घाट, रावेत येथे करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अखिल खान्देश युवा प्रतिष्ठान, खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेह वर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार मित्र मंडळ, खान्देश बारी समाज, खान्देश माळी महासंघ, संतसेना महाराज खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहूजन विकास समिती, खान्देश सोनार समाज, धनगर समाज मंडळ, खान्देश महाराणा मित्र मंडळ, खान्देश कुंभार समाज मंडळ, खान्देश लाड शाखीय वाणी समाज मंडळ, खान्देश लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ तसेच सर्व खान्देश वासियांचे सहकार्य लाभले. खान्देशातील सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी मोठया संख्येने या उत्सवात सहभागी होवून भक्तीभावात भाविक तल्लीन झाल्याची माहिती नामदेव ढाके यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भरत बारी यांनी केले. आभार आमदार उमा खापरे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button