Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या

राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांची आयुक्तांना सूचना

पिंपरी-चिंचवड | ‘शहराच्या आरोग्याची काळजी सफाई कर्मचारी घेत असतात. स्वच्छतेचे काम करताना त्यांना अनेकवेळा अडचणींना सामोरे जावे लागत असते. त्यांच्या अडीअडचणी तातडीने सोडवून मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा,’ अशी सूचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिली. महानगरपालिका आस्थापनावरील सफाई कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मंगळवारी (दि २०) राज्य सफाई कर्मचारी आयोगाची बैठक शेरसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, सचिन पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी ॲड.सागर चरण, गणेश भोसले, संजय जगदाळे, प्रताप सोंळखी, करण चव्हाण, निखील बैद, राजेश राजोरिया, सोनाथ बैद, प्राची साळवे, वाल्मिकी समाज अध्यक्ष विष्णू चावरिया आदी बैठकीला उपस्थित होते.

शेरसिंग डागोर म्हणाले, ‘सफाई कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाने अनेक धोरणे राबवली आहेत. त्या धोरणांचा सर्वांकष अभ्यास करून अधिकाधिक योजना, हक्क आणि अधिकार सफाई कर्मचारी आणि त्यांच्या वारसांना मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे यावे. शोषित, वंचित घटकातून सफाई कर्मचारी येत असतात. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेप्रमाणे नोकरी द्यावी. शासनाचे आवश्यक लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून कार्यवाही करावी,’ असे निर्देशही त्यांनी दिले.

हेही  वाचा   :    पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्या

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे. धन्वंतरी सारख्या वैद्यकीय विमा योजनांचा त्यांना विना त्रास आणि कोणताही आर्थिक भार त्यांच्यावर न टाकता लाभ देणे गरजेचे आहे. त्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचवावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत. अनुकंपाचे प्रश्न विहित मुदतीमध्ये सोडवण्यात यावेत. लाड पागे समितीच्या शिफारसीचे तंतोतंत पालन करून त्यांना त्याचे हक्क, अधिकार द्यावेत, असे निर्देशही शेरसिंग डागोर यांनी दिले.

नोडल अधिकारी नियुक्त करा

सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाबाबत शासनाचा निर्णय आहे. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा देखील महानगरपालिकेने प्रश्न सोडवावेत. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यामधील त्रुटी दूर करणे, शासनाचे आवश्यक लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून कार्यवाही करावी, असेही शेरसिंग डागोर म्हणाले. बैठकीमध्ये सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, लाभार्थी यांनी विविध समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण तातडीने महानगरपालिका प्रशासनाने कराव्यात, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना गती – आयुक्त

यावेळी आयुक्त सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे. महापालिकेकडे सध्या सफाई कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न, समस्या प्रलंबित आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर गतीने काम सुरू आहे. जिथे तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यातूनही मार्ग काढण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. यासाठी सफाई कामगारांच्या संबंधित असणाऱ्या सर्व परिपत्रकांचा अभ्यास केला जात आहे,असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button