breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पथारीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्या – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी / महाईन्यूज

प्रभागस्तरावरील समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी विभागांनी समन्वय ठेवून नियोजन करावे असे प्रतिपादन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. पथारीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

महापालिकेच्या निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र.१ आणि ११ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग स्तरावरील समस्या, पावसाळी कामे, अतिक्रमण तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, कोरोना विषयक नियोजन अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस फ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, नगरसदस्या साधना मळेकर, योगिता नागरगोजे, नगरसदस्य एकनाथ पवार, संतोष नेवाळे, फ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, सह शहर अभियंता प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, सुनिल वाघुंडे, संजय भोसले, रामनाथ टकले, प्रविण घोडे आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रभागातील जलशुद्धीकरण केंद्र, अग्निशमन केंद्र, संतपीठ आदी प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी, काही भागांमधील रस्ते खचले असून ते तातडीने दुरुस्त करावेत, धर्मराजनगर ते जलशुद्धीकरण पर्यंतचा रस्ता विकसित करावा, टाऊन हॉलचा प्रकल्प मार्गी लावावा, चिखली ते सोनावणे वस्तीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, धनगरबाबा नाला बांधणीच्या कामाला आवश्यक तरतूद उपलब्ध करून द्यावी, विविध कामांसाठी रस्त्यांची केलेली खोदाई तातडीने बुजवावी, तुटलेले ड्रेनेज चेंबर्स दुरुस्त करावेत, ज्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे तेथे योग्य व्यवस्थापन करावे, नाल्यांमध्ये कचरा टाकण्या-यांवर कारवाई करावी, घरकुल भाजी मंडईचा विषय मार्गी लावावा, नेवाळे वस्ती ते कुदळवाडी रस्ता विकसित करणे, पदपथावरील अतिक्रमण हटवावे, दिवंगत गोपिनाथ मुंढे यांचा पुतळा उभारण्यात यावा, घरकुलसाठी स्वतंत्र पोलिस चौकी उभारावी, डीपी मधील रस्त्यांची कामे प्राधान्याने करावीत, फ प्रभागासाठी मध्यवर्ती ठिकाणी प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, ठेकेदारांकडे काम करणा-या कर्मचा-यांना पूर्ण वेतन दिले जात नाही याकडे गांभीर्याने लक्ष घालावे आदी सूचना नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या. बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच पूर्ण झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, शहरातील विविध भागांमध्ये उत्तम रस्ते विकसित झाले आहेत. या रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी नियोजन करण्यात येत असून पदपथावरील हॉकर्सचे देखील प्राधान्याने नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी हॉकर्स झोन तयार करण्याचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. रहदारीस अडथळा ठरण्या-या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करावी असे निर्देश देखील आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक आयोजित करण्याची सूचना आयुक्त पाटील यांनी अधिका-यांना केली. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी एम. आर. खरात यांनी बैठकीत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button