भोसरीतील ‘स्वामी समर्थ विद्यामंदिर’ची गरुडझेप; ऋतुंबरा काळे पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथम, राज्यात १२ वी!
इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत टागोर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (२०२५-२६) भोसरी येथील टागोर शिक्षण संस्थेच्या ‘श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर’ (इंद्रायणी नगर) या विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाची इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी कु. ऋतुंबरा अभिजीत काळे हिने ३०० पैकी २७६ गुण मिळवून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऋतुंबराने राज्यात गुणवत्ता यादीत १२ वा तर पुणे जिल्ह्यात ६ वा क्रमांक मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ऋतुंबरा सोबतच इयत्ता ८ वीमधून कु. श्रेया योगेश कलशेट्टी (२३४/३०० गुण) आणि टागोर विद्यालयाचा विद्यार्थी सुरज अरविंद सोळंकी (२२०/३०० गुण) यांनीही परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांचीही बाजी
इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. यामध्ये इंद्रवदन अभिजीत काळे याने २५०/३०० गुण आणि राजवीर परमेश्वर कांबळे याने २२६/३०० गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. या दोन्ही इयत्तांमधील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.
मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांना मिळालेले दर्जेदार मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. ८ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक श्री. बनसुडे सुखदेव, श्री. कुंभार संजय व श्री. घाडगे किसन यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच ५ वीच्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. बनसुडे सुखदेव, श्री. तोरणे शरद आणि श्री. भालेराव श्रीकृष्ण यांचेही या यशात मोठे योगदान आहे.
संस्थेच्या वतीने कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन श्री. नंदकुमार विठोबा लांडे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. महेश घावटे, सचिव श्री. सुरेश फलके, सुरज स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुरजभाऊ लांडे पाटील, श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर (माध्यमिक) चे मुख्याध्यापक श्री. ढोले उद्धव, टागोर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संतोष काळे, लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक श्री. हनुमंत आगे, श्री स्वामी समर्थ (प्राथमिक) विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा गुरव, पर्यवेक्षक श्री. शिवाजी गुरव आणि सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या यशामुळे संपूर्ण भोसरी परिसरातून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”जिद्द, कठोर मेहनत, चिकाटी, सततचा सराव आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यांमुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो.”
— यशस्वी विद्यार्थी





