वेळेत मिळकतकर बील न देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित कराः मारूती भापकर
![Suspend officers-employees who do not pay income tax bills on time: Maruti Bhapkar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Maruti-Bhapkar-780x470.jpg)
पिंपरी : थकबाकीदार असलेल्या नागरिकांकडून कर वसुलीसाठी प्रॉपर्टी सील करणे, नळ कनेक्शन तोडणे, जप्ती करणे, घरातील टीव्ही, फ्रिज थकबाकी पोटी उचलून नेणे अशाप्रकारे कारवाई करण्याचे आदेश विभाग प्रमुखांनी दिलेले आहेत. करआकारणी व करसंकलन विभागाकडून कोविड महामारीच्या काळात दोन-तीन वर्षे मिळकत धारकांना नियमित मिळकत कर बील दिलीच गेली नाही. कोविड प्रतिबंध उठवण्यात आले तरी नागरिकांना मिळकत कर बील देण्यात आली नाही. तीन-चार वर्षापासून मिळकत कर बील न दिल्यामुळे आज जी मिळकत कर बील देण्यात येते ते एकदम चार-पाच वर्षाची थकबाकी म्हणून बील दिली जाते. यामध्ये प्रशासकीय सेवाशुल्क, सामान्य कर वृक्ष उपकर, मलप्रवाह सुविधा लाभकर, पाणीपुरवठा लाभकर, रस्ताकर, शिक्षण कर मनपा शास्तीकर, शिक्षणकर लावून त्यावर चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज लावून बील दिली जात आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडून थकबाकीदारकांवर धडक कारवाई सुरू केली आहे. करआकारणी व करसंकलन विभागाकडून कोविड महामारीच्या काळात दोन-तीन वर्षे मिळकत धारकांना नियमित मिळकत कर बील देण्यात आलेले नाही, अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.
खरे तर वेळच्यावेळी मिळकत कर भरणे ही कायदेशीर जबाबदारी प्रत्येक करदात्या नागरिकांची आहे. हे बरोबरच आहे. मात्र मनपाने देखील वेळच्या वेळी मिळकत कराची बीले मिळकत धारकांना देणे ही देखील अधिकारी कर्मचाऱ्यांची कायदेशीर जबाबदारीच आहे. त्यामुळे करआकारणी करसंकलन विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, ठेकेदारांनी मिळकत धारकांना मागील चार-पाच वर्षापासून मिळकत कर भरण्याची बीले वेळेत दिली नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्या पगारातून या दंडाची निम्मी रक्कम वसूल करावी.
तसेच शहरातील सोसायटी आपार्टमेंट मधील एक- दोन फ्लॅट धारकांचे मिळकतकर थकबाकी असेल तर संपूर्ण अपार्टमेंट सोसायटी चे पाणी बंद करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही खासदार, आमदार, नगरसेवक यांना फोन करतो असे म्हणाले तर कोण खासदार? कोण आमदार? कोण नगरसेवक? कोणाला सांगायचे ते सांगा आम्ही कोणाला घाबरत नाही तुम्ही कोणालाही सांगितले तरी आम्ही कोणाचे ऐकणार नाही तुम्ही थकबाकीदारांनी पैसे भरा अन्यथा आम्ही तुमचे नळ कनेक्शन बंद करू तसे आमच्या वरिष्ठांचे आदेश आहेत असे हे कर्मचारी अधिकारी मिळकत धारकांना सांगतात.
त्यामुळे मिळकत कराची बीलं वेळेवर न देणारे अधिकारी कर्मचारी यांच्या पगारातून निम्मी रक्कम वसूल करून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच सोसायटी, आपार्टमेंट मधील एक- दोन फ्लॅट धारकांचे मिळकतकर थकीत असेल तर संपूर्ण सोसायटी आपार्टमेंटचे पाणी बंद करू नये. जर आपण असा निर्णय घेतला नाही तर शहरातील नागरिकांना एकत्रित करून आम्हाला आपल्या विरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिला.