विद्यार्थ्यांच्या स्टायफंड वळवला बायको आणि बहिणीच्या बँक खात्यात : उच्चशिक्षित चोरट्याला अटक
पिंपरी l प्रतिनिधी
एका उच्चशिक्षित चोरट्याने चिंचवड येथील शिक्षण संस्थेतील संगणक प्रणालीचा पासवर्ड क्रॅक केला. त्याआधारे शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्टायफंडसाठी देण्यात आलेल्या बँक खाते क्रमांकाच्या जागी बहीण आणि पत्नीचा बँक खाते क्रमांक टाकला. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या स्टायफंडची रक्कम आपसूक चोरट्याने बहीण आणि पत्नीच्या खात्याद्वारे चोरली. या स्मार्ट चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
विक्रांत स्वामीनाथ भिंगे (वय 34, रा. पाषाण गावठाण, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 20 एप्रिल 2021 ते 15 मे 2021 या कालावधीत चिंचवडमधील एका शैक्षणिक संस्थेच्या संगणकाचा पासवर्ड भिंगे याने चोरला. त्याद्वारे अकाऊंटमध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या स्टायपंडची रक्कम दोन महिलांच्या खात्यावर जमा केली. याप्रकरणी 7 जुलै 2021 रोजी बॅंक खातेदार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या खातेधारक महिलांना बोलावून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. मात्र त्याबाबत महिलांना काहीच माहिती नव्हते. यामुळे पोलिसांना या गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचण्यास अडचण येऊ लागली. एका महिलेच्या बॅंक खात्याला तिच्या पतीचा म्हणजे आरोपी विक्रांत भिंगे याचा मोबाइल क्रमांक जोडलेला होता. पोलिसांनी या क्रमांकाची माहिती घेतली.
यामध्ये पोलिसांना एक सुगावा लागला. ज्या-ज्या वेळी संबंधित महिलांच्या बॅंक खात्यावरील रक्कम एटीएमद्वारे काढण्यात आली त्यावेळी आरोपी भिंगे हा तिथे असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाले. संशयावरून पोलिसांनी भिंगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी भिंगे हा देखील एका शैक्षणिक संस्थेत कामाला आहे. त्याने सहज चिंचवडमधील शैक्षणिक संस्थेच्या संगणक प्रणालीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पासवर्ड सोपा असल्याने त्यास घुसखोरी करण्यात यश आले. त्यानंतर त्याने शैक्षणिक संस्थेच्या अकाऊंटमध्ये बदल करून त्याजागी स्वतःची बहीण आणि बायकोच्या बॅंक खात्याचा क्रमांक टाकला. त्या दोघीही फारशा शिकलेल्या नसल्याने त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याचे भिंगे याने पोलीस तपासात सांगितले आहे.