विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उपक्रम

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे विद्यार्थ्यांना कचऱ्याचा कमी वापर, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण या तत्त्वांवर आधारित महापालिकेच्या अभिनव आर.आर.आर. सेंटर संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल, तसेच पर्यावरण संरक्षणात प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२६ तसेच माझी वसुंधरा ६.० अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – वांद्रे स्कायवॉकचे लोकार्पण 26 जानेवारीला

यावेळी केंद्र शासनाच्या “स्वच्छ आदत से स्वच्छ भारत” या उपक्रमांतर्गत ओला व सुका कचरा विलगीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाच्या डब्याचा व सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाच्या डब्याचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे, सार्वजनिक शौचालयांचा योग्य वापर करणे तसेच “फ्लश करा, हात स्वच्छ ठेवा” या स्वच्छतेच्या सवयींबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थी देखील बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्राच्या माध्यमातून कमी वापर, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या संकल्पनांच्या आधारे शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला जात आहे. अशा अभिनव व कल्पक उपक्रमांमुळे शहर अधिक स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास निश्चितच मदत होईल.
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका




