दहावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी-चिंचवड | दहावीच्या परिक्षेत ३९ टक्के इतके कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावी उत्तीण झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चर्होली फाटा येथील तनिष्क सोसायटीत मंगळवारी (दि. १३) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली.
सुप्रजा हरि बाबू (वय १६, रा. तनिष्क सोसायटी, चर्होली फाटा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सुप्रजाचे वडील बँकेत नोकरीला आहेत. ती आई, वडील, मोठी बहिण आणि छोटा भाऊ यांच्यासमवेत राहत होती. मंगळवारी (दि. १३) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (एसएससी)आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. सुप्रजा हिने दहावीची परिक्षा दिली होती. आज दुपारी एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. त्यानंतर काही वेळाने ती घरातील शयनगृहात गेली. बराच वेळ सुप्रजा बाहेर न आल्याने तिच्या आईने शयनगृहात जाऊन पाहिले असता सुप्रजा साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार पाहताच तिच्या आईने एकच हंबरडा फोडला. आवाजामुळे शेजारच्या रहिवाशांनी त्यांच्या घरात धाव घेतली.
हेही वाचा : स्वरा कदम हिचे दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश!
शेजार्यांनी त्वरीत दिघी पोलीसांना कळविले. तोपर्यंत रहिवाशांनी तिला खाली उतरविले. पोलीसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेतील सुप्रजाला त्वरीत महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुरूवातीला सुप्रजा हिने परिक्षेत अनुत्तीर्ण झालमुळे आत्महत्या केली असावी, असा समज होता. परंतु, नातेवाईकांनी पुन्हा तिचा निकाल पाहिला असता सुप्रजा ही ३९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. त्यामुळे परिक्षेत कमी गुण मिळाल्याने सुप्रजाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.