ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाचे खासगीकरण थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन’

अण्णासाहेब मगर स्टेडियम बचाव कृती समितीचा इशारा

पिंपरी चिंचवड | नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाच्या 25 एकर क्षेत्रफळापैकी 10 एकर जागेवर क्लब आणि क्रिकेट स्टेडियम ‘पीपीपी’ तत्वावर विकसित करण्याचे धोरण चुकीचे आहे. परिसरातील झोडपडपट्यांमध्ये राहणारी मुले पैसे भरुन मैदानाचा वापर करु शकणार नाहीत. मैदानी खेळाअभावी शारीरिकदृष्ट्या विकलांगतेकडे जातील. त्यासाठी संकुलाच्या 10 एकर जागेत नियोजित असलेले ‘पीपीपी’ तत्वावरील विकसित करण्याचे क्रिकेड स्टेडियमचे धोरण तत्काळ रद्द करावे, अशी मागणी अण्णासाहेब मगर स्टेडियम बचाव कृती समितीने केली आहे. अन्यथा मैदान खासगीकरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

याबाबत अण्णासाहेब मगर स्टेडियम बचाव कृती समितीचे अध्यक्ष अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची भेट घेतली. पीपीपी’ तत्वावरील विकसित करण्याचे नियोजित असलेले क्रिकेड स्टेडियमचे धोरण तत्काळ रद्द करण्याची विनंती केली. आयुक्त राजेश पाटील, स्थानिक नगरसेवक समीर मासुळकर यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मगर स्टेडियम हे कुठल्याही विशिष्ट खेळासाठी विकसित न करता ते पूर्वीसारखे मोकळे मैदान म्हणून सर्व प्रकारच्या खेळासाठी पालिकेच्या वतीने पुर्नविकसीत व व्यवस्थापित करावे. शहरातील कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे मैदानावरील जम्बो कोविड केअर सेंटर तत्काळ हलविण्यात यावे. मैदान स्थानिकांना वापरास खुले करावे.

अण्णासाहेब मगर स्टेडियम परिसरात विठ्ठलनगर, यशवंतनगर, आंबेडकरनगर, बालाजीनगर, महात्मा फुलेनगर, गांधीनगर या झोपडपट्या आहेत. मोठ्या प्रमाणावर गोरगरीब सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या मागास असलेले नागरिक हजारोंच्या संख्येने वास्तव्यास आहेत. झोपडपट्टी असल्याकारणाने अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात सुविधांच्या अभावासह हजारो कुटुंब मागील कित्येक वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास आहेत. शालेय विद्यार्थ्यांना दिवाळी, उन्हाळी सुट्टीत, तसेच मैदानी खेळासाठी, महाविद्यालयीन युवकांना, पोलीस, सैनिकी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना त्यांच्या शारीरिक कसरतीसाठी या मैदानाचा वापर करत आहेत. नेहरुनगर, अजमेरा, उद्यमनगर, संत तुकारामनगरयासह शहराच्या वेगवेगळ्या भागातून ज्येष्ठ नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून मैदानाचा वापर शारीरिक कसरतीसाठी करतात. या सर्वांसाठी हे मैदान एक वरदान आहे.

या मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेली लोकसंख्येची घनता, झोपडपट्यांची संख्या, इतर क्रिडांगणाचा विचार करता अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल हे एका विशिष्ट खेळासाठी पीपीपी तत्तावर विकसित करु नये. कोणत्याही खासगी मालकास न देता पूर्वीसारखे मोकळे मैदान म्हणून सर्व प्रकारच्या खेळांसाठी पालिकेच्या वतीने पुवर्विकसीत व व्यवस्थापित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button