पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी आकृतीबंधाला राज्य शासनाची मंजुरी
![पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी आकृतीबंधाला राज्य शासनाची मंजुरी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/mahesh-landge.jpg)
- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
- विद्युत विभागातील प्रस्तावित पदांपैकी ५० वाढीव पदे निर्माण करणार
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामाची व्याप्ती लक्षात घेवून राज्य शासनाने ५० वाढीव पदांना अखेर मंजुरी दिली आहे. याबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे.
महापालिका प्रशासनाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध तयार करण्यात आला होता. तसा प्रस्ताव दि. १४ जून २०१७ रोजी राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, नगरविकास खात्याकडून अद्याप मंजुरी दिली नव्हती.
दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला. महापालिकेतील कर्मचारी संख्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कर्मचारी, मयत कर्मचारी, स्वेच्छा निवृत्त कर्मचारी कमी होत आहेत. तसेच, शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासकीय कामाचा व्यापही वाढत आहे. पूर्वी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ४ इतकी होती. त्यामध्ये वाढ होवून आता ती संख्या ८ इतकी झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्याला अखेर यश मिळाले आहे.
- सहशहर अभियंतासह ५० नव्या पदांना मंजुरी…
राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाकडून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता विद्युत विभागातील ५० नवी पदे भरण्यात येतील. सहशहर अभियंता-१, कार्यकारी अभियंता- ३, उप अभियंता- ४, कनिष्ठ अभियंता- ७, विद्युत पर्यवेक्षक- ५, विजतंत्री- १०, वायरमन- २० अशा पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
- आयुक्तांनी त्वरीत अंमलबजावणी करावी : आमदार लांडगे
राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने महापालिका विद्युत विभागातील संबंधित ५० पदांच्या आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने शासनाच्या आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.