ताथवडेतील JSPM कॉलेजच्या सांडपाण्याने सोसायटीधारक रहिवासी हैराण!
नोव्हा रेसिडेन्सीचा महापालिकेकडे कारवाईची मागणी : - २०२३ पासून दूषित पाण्याचा त्रास; आरोग्य धोक्यात असल्याचा रहिवाशांचा आरोप

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
ताथवडे येथील नोव्हा रेसिडेन्सी को-ऑप. हाऊसिंग सोसायटीने JSPM महाविद्यालयाच्या ड्रेनेज लाईनमधून सातत्याने दूषित सांडपाणी सोसायटीच्या परिसरात येत असल्याचा गंभीर आरोप करत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. याबाबत सोसायटीने आयुक्त, आरोग्य विभाग आणि जलनिस्सारण विभागाला शनिवारी (११ जुलै) लेखी निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, २०२३ पासून JSPM महाविद्यालयाच्या मुख्य ड्रेनेज लाईनमधून वारंवार गळती होत असून, दूषित सांडपाणी नोव्हा रेसिडेन्सीच्या आवारात आणि मागील बाजूस साचत आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही समस्या पुन्हा तीव्र झाली असून परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
हेही वाचा
भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!
सोसायटीच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेक वेळा JSPM प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, प्रत्येकवेळी केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोसायटीत लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे ६५ कुटुंबे वास्तव्यास असल्याने दूषित पाण्यामुळे कॉलरा, कावीळ, डेंग्यूसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महापालिकेकडे चार प्रमुख मागण्या…
सोसायटीने महापालिकेकडे पुढील मागण्या केल्या आहेत – JSPM कॉलेजच्या ड्रेनेज लाईनची तात्काळ संपूर्ण तपासणी करून गळती कायमस्वरूपी दुरुस्त करावी. सोसायटीत येणारे दूषित सांडपाणी त्वरित बंद करावे. प्रभावित परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. २०२२ पासून सुरू असलेल्या समस्येची जबाबदारी निश्चित करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. या समस्येमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आल्याचा दावा करत रहिवाशांनी महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
“गेल्या २०२३ पासून JSPM कॉलेजच्या ड्रेनेज लाईनमधून दूषित सांडपाण्याची गळती होत असून, आम्ही अनेक वेळा संबंधितांकडे तक्रारी केल्या. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर झाली असून परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता वाढली आहे. सोसायटीतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने तातडीने हस्तक्षेप करून गळती कायमस्वरूपी थांबवावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.”
– अध्यक्ष, सचिव,
– नोव्हा रेसिडेन्सी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी.





