पिंपळे सौदागरमध्ये ७० फुटी रावण दहनातून सामाजिक संदेशाचा जागर
शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने रावण दहन व सांस्कृतिक कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागर येथे दसऱ्यानिमित्त भव्य ७० फुटी रावण दहन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन गोविंद यशदा चौक, बीआरटी रोड, पिंपळे सौदागर येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणाने झाली.कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, पवना सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन जयनाथ काटे उपस्थित होते.
हेही वाचा : एक हात मदतीचा: पूरग्रस्त 50 गावांची दिवाळी गोड करण्याचा निर्धार!
कार्यक्रमाची सुरुवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. कुणाल मोरे यांच्या डान्स फ्लोर स्टुडिओच्या ग्रुपने सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. हरियाणातील सुनील अनिल तिलकधारी यांचं “हनुमान” सादरीकरण व “महाकाल” आधारित नृत्य विशेष आकर्षण ठरले.कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी रंगत वाढवली. गायक अवधूत गांधी, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व अभिज्ञा भावे यांनी सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता भव्य रावण दहनाने झाली. ७० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन होताच, उपस्थितांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषात विजय साजरा केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यशस्वी आयोजनाबद्दल नागरिक, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, अग्निशामक दल आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय मोरे यांनी केले.





