धक्कादायक! पत्नीचा खून करून पतीची पोलिस ठाण्यात आत्महत्या
चिखली येथील घटनेने खळबळ

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून आवळला गळा
पिंपरी : चिखलीमध्ये पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून पतीने तिचा गळा दाबून खून केला आणि आत्महत्या करत स्वतःला संपविले. हा धक्कादायक प्रकार चिखली येथे घडला आहे.
शरद रुपचंद चितळे (३३, रा. रुपीनगर, तळवडे) असे विष पिऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. कांचन शरद चितळे (वय २६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद चितळे हा एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला जात होता. त्याची पत्नी कांचन ही आशा वर्कर होती. कांचन हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला संशय होता. त्यातून त्याने दि. १३ एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना तिचा गळा आवळला. यात ती बेशुद्ध झाली. तसेच त्याने स्वत: देखील नायलाॅनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा – ‘एआय’चा उपयोग स्टार्टअपसाठी करा – महावीर मुथा
शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तसेच कांचन हिला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
दरम्यान, शरद याच्यावर उपचार सुरू होते. त्याला शुक्रवारी (दि. १८) रुग्णालयातून सोडण्यात आले. तसेच कांचन हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद याला नातेवाईकांसह चिखली पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शरद याने फरशी पुसण्याचे लिक्विड पिल्याचे निदर्शनास आले. त्याला नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
‘सीआयडी’ करणार तपास
पोलिस ठाण्यात किंवा पोलिस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) संबंधित प्रकरणाचा तपास केला जातो. शरद चितळे याच्या आत्महत्या प्रकरणात देखील सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे.
ससून रुग्णालयात शवविच्छेदन
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील मृतांचे शवविच्छेदन पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात केले जाते. मात्र, शरद चितळे याने पोलिस ठाण्यात फरशी पुसण्याचे लिक्विड पिऊन आत्महत्या केली. पोलिस ठाण्यात किंवा आवारात मृत्यू झाल्यास संबंधित शवविच्छेदन तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पॅनेलकडून केले जाते. पुण्यातील ससून रुग्णालयात डाॅक्टरांचे पॅनेल असल्याने शरद चितळे याचा मृतदेह ससून रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर अहवाल प्राप्त होणार आहे.