कोरोनाने आई-वडील गमावलेल्या पाल्यांची शिवसेना उचलणार शैक्षणिक जबाबदारी!
![Shiv Sena to take up educational responsibility for children who lost their parents due to Corona!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/chilfren13.jpg)
- शिवसेना समन्वय दादासाहेब नरळे यांनी सोशल मीडियातून केलं आवाहन
पिंपरी |महाईन्यूज|
राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मागील दीड महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली होती. या काळात अनेकांनी आपल्या घरातलं माणूस गमावलं आहे. काही ठिकाणी तर आई-वडील दोघांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने शेकडो मुलं पोरकी झाली आहेत. अशा परस्थितीत ‘त्या’ अनाथ मुलांची शैक्षणिक जबाबदारी उचलून त्यांचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत मदत करणार आहे, अशी माहिती शिवसेना समन्वय दादासाहेब नरळे यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियातून नागरिकांना आवाहन करीत अनाथ मुलांची सर्व माहिती पाठविण्यात यावी, असेही म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने हाहाकार उडाला होता. मात्र, सध्यस्थितीत परस्थिती आटोक्यात आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरवासियांना दिलासा मिळत आहे. मात्र, मागील दीड महिन्यात कित्येक कुटूंबाचे तारणहार, अनेक मुला-मुलींचे आई किंवा वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्यावर जणू आभाळ कोसळले आहे. त्या मुलांची जबाबदारी शिवसेनेकडून उचलून त्यांना शैक्षणिक मदत करण्यात येणार आहे.
तसेच ज्यांचे शिक्षण खंडित होण्याने त्यांच्या पुढील आयुष्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून हा निश्चितपणे पुढाकार घेवून पुढील शैक्षणिक मदत करण्याचा आमचा मानस आहे. पालक गमावलेला मुलगा किंवा मुलगी हे सक्षमपणे त्यांच्या पायावर उभे राहायला हवे, त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण होईपर्यंत शिक्षणाकरिता मदत तसेच त्यांच्या योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य आणि शिक्षणाकरिता येणारा अन्य खर्च, हा शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
दरम्यान, शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, भोसरी विधानसभेतील सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनानूसार अनाथ मुलांंच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी गरजू नागरिकांपर्यंत ही माहिती द्या, जेणेकरुन त्या मुलांच्या शिक्षणाला हातभार लागेल, असेही नरळे यांनी सांगितले.