पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसैनिकांचा निर्धार, विजयाचा हुंकार!
मिशन-PCMC: भगवा फडकवण्यासाठी उदय सामंत यांनी फुंकले रणशिंग

पिंपरी-चिंचवड : “शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून तो एक प्रखर विचार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आतापासूनच ‘विजयाचा हुंकार’ बुलंद करावा,” असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा पुणे जिल्हा शिवसेना संपर्क मंत्री ना. उदयजी सामंत यांनी केले.
वाकड येथील ‘हॉटेल टिपटॉप’ मध्ये आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीमुळे शहरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.
रणनीतीवर चर्चा आणि कार्यकर्त्यांना बळ

यावेळी उदय सामंत यांनी आगामी निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकद पोहोचवणे आवश्यक आहे. महापालिकेत जनहिताचे निर्णय घेण्यासाठी शिवसेनेची सत्ता असणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीला खिंडार; भाजपाचा विरोधकांना ‘मास्टर स्ट्रोक’

दिग्गजांची उपस्थिती….
या बैठकीला मावळ लोकसभेचे ‘महासंसद रत्न’ खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद आणि उपनेत्या सुलभाताई उबाळे यांनीही निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
संघटनेची वज्रमूठ…
या ऐतिहासिक बैठकीला युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, जिल्हा समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, महिला जिल्हा प्रमुख शिलाताई भोंडवे, महानगर प्रमुख राजेश वाबळे, शहर प्रमुख निलेश तरस यांसह युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, राजेंद्र तरस आणि युवतीसेना अध्यक्ष सायलीताई साळवी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीने पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेने विजयासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.




