breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणात १८ टक्के पाणीसाठा; पाणीकपातीबाबत आयुक्त म्हणाले..

पिंपरी | पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात अद्यापही पावसाचा जोर वाढला नाही. जून महिना कोरडाच गेला. धरण परिसरात केवळ २९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात १८ टक्के पाणीसाठा आहे. तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नाही. पण, पावसाने ओढ दिल्यास पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. काही दिवसांसाठी सुरू केलेला असा पाणीपुरवठा साडेचार वर्षे झाले, तरी कायम आहे. शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग आणि सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

हेही वाचा   –      सेन्सेक्सनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला, ८० हजारांचा टप्पा पार, निफ्टीही सुसाट 

आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागांतील रहिवाशांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे. शहराची पवना धरणावर सर्वाधिक भिस्त आहे. परंतु, जून महिन्यात धरण परिसरात जोरदार पाऊस झाला नाही. दि. १ जूनपासून २९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाणीसाठा १८.१४ टक्के आहे. हा साठा २० जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. परंतु, धरण परिसरात अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही. गतवर्षी आजमितीला २०.१६ टक्के पाणीसाठा होता. तर, ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात हलका पाऊस पडत आहे. मात्र, मोठ्या पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे. जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. अद्यापही पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे धरणात येवा सुरू झाला नाही. १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पाहून कपातीबाबत नियोजन करणे आवश्यक आहे.

– रजनीश बारिया, पवना धरण शाखा अभियंता. 

तूर्तास पाणीकपातीची आवश्यकता नाही. पण, पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार पाणीकपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. जुलैमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button