breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील हातगाडी, फेरीवाल्यांसाठी ‘हॉकर्स झोन’ द्या!

दापोडीसारखी घटना पुन्हा नको : युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांची प्रशासनला मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकातील महिलांनी सोमवारी दापोडी येथे अतिक्रमण कारवाई करीत असताना एका भाजी विक्रेत्या महिलेला अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे सर्वस्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने ‘हॉकर्स झोन’ धोरणाची अंमलबजावणी करावी. तसेच, फेरीवाल्यांचे नुकसान होईल, अशी कारवाई करु नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केली आहे.

प्रभाग क्र. ३०. परिसरातील टपरी, हातगाडी वर भाजीपाला, फळे, नाष्टा व इतर व्यवसायिक यांना महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या वारंवार अतिक्रमणाच्या कारवाईला सामोरे जावे लागते. अशा हातावर पोट असणाऱ्यांनी काम कसे करावे व आपल्या परिवाराचे पालन पोषण कसे करावे. त्यांना जगण्याचे दुसरे साधन नसल्यामुळे प्रभाग क्र. ३० परिसरातील हातगाडी, टपरी, पथारी व्यवसायिकांना नियमित व्यवसाय करून द्यावा. वारंवार त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या रोजीरोटीवर गदा आणू नये, अशी मागणीही शेखर काटे यांनी केली आहे.

हेही वाचा     –      ..पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल? पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य 

याबाबत पथारी व्यवसायिकांचे म्हणणे असे आहे की, तानाजी पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत माजी आयुक्तांनी तेथे व्यवसाय करण्यासाठी पिवळ्या रेषा आखून दिल्या होत्या. त्या नियमानुसारच त्यावर आजतागायत सदर पथारीव्यवसायिक व्यवसाय करत आहे. दररोजच्या अतिक्रमणाच्या कारवाईला कंटाळून जर कोणी जीवाचे बरे वाईट केले तर याला जबाबदार कोण, असाही सवाल या निमित्त उपस्थित केला जात आहे.

मागीलवर्षी प्रशासनाने सर्वे केला. या व्यवसायिकांना नियमानुसार परवाना नंबर ही दिला, परंतु हॉकर्स झोनप्रमाणे निर्धारित जागा, निर्धारित सीमा रेषा, या सर्व बाबी अद्याप रखडल्या आहेत. सद्यस्थिती प्रशासन जोपर्यंत हॉकर्स झोन पूर्ण करत नाही, तोपर्यंत या हातावर पोट भरणाऱ्यांची व्यवस्था योग्य प्रकारे करावी. त्यांना अतिक्रमण कारवाईचा त्रास होऊ नये याची जबाबदारी घ्यावी, अशी आमची मागणी आहे.

– शेखर काटे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button