‘महिला-भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा’; शंकर जगताप
रहाटणीत गुरुवारी मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजनेचा "शुभारंभ"
![Shankar Jagtap said that women and sisters should take advantage of Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Shankar-Jagtap-780x470.jpg)
पिंपरी | महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महायुती सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेचा पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनींनी मोठया संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील महिला भगिनींना या योजनेचा मोठया प्रमाणात लाभ घेता यावा, तसेच योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदार संघातील विमल गार्डन, रहाटणी येथे गुरुवार, दि. ४ जुलै रोजी, सकाळी १० वाजता योजनेचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये, पात्रता धारक महिलांचे अर्ज भरून घेण्यात येतील. तसेच, आवश्यक कागदपत्रांची माहिती, योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे तसेच योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात १ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर
माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना महायुतीच्या सरकारने आणल्या आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय लगेचच काढण्यात आला आहे. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलेल्या महिलांना ही योजना लागू असून या योजनेंतर्गत दरमहा १ हजार ५०० रुपये दरमहा लाभार्थी महिलेच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्य शासन समाजहिताच्या अनेक योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक पात्र भगिनींना लाभ होईल.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)