Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

IAS शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व कामांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ‘RTI’

शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा सवाल : सर्व निर्णय, निविदा मंजुरींची चौकशी करा

पिंपरी-चिंचवड । प्रतिक्रिया 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी आयुक्त शेखर सिंह (IAS) यांच्या बदलीपूर्व ३० दिवसांत मंजूर केलेल्या भांडवली कामांवर आणि टेंडर प्रक्रियेवर सध्या राजकीय वाद उभा आहे. भाजपने शहरात दोन ठिकाणी आयुक्तांचा नागरी सन्मान सोहळा आयोजित केला असून, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत लेखा विभागाला सविस्तर माहिती मागितली आहे.

याबाबत तुषार कामठे यांनी लेखा विभागाला दिलेल्या अर्जात, ११ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांनी मंजूर केलेल्या सर्व भांडवली कामांची यादी, विभागाचे नाव, कामाचे नाव, अंदाजपत्रक रक्कम, मंजुरी दिनांक तसेच मंजूर झालेल्या टेंडरचे कामाचे नाव, अंदाजपत्रक रक्कम, मंजूर कंत्राटदाराचे नाव, निविदा क्रमांक, मंजुरी दिनांक यांसह तपशील मागितला आहे. विशेष आदेशाने किंवा तातडीने मंजूर करण्यात आलेल्या कामांचा स्वतंत्र तपशील आणि टेंडर संबंधित फाइलचा तपशील देखील अर्जात नमूद आहे.

हेही वाचा     :          Good News: राज्यातील जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांची ‘‘दिवाळी गोड’’! 

शेखर सिंह यांना नाशिक येथील कुंभमेळा आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती मिळाली आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांच्या महानगरपालिकेतील कारकीर्दीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेखर सिंह यांची कारकीर्द स्थानिक राजकीय वर्तुळातही ही घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या काळातील कामकाजात अनियमितता किंवा गैरव्यवहार झाल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत.

“भाजपने आयुक्तांना मोठा नागरी सन्मान दिला आहे, पण त्यांच्या कारकीर्दीतील काही गंभीर प्रश्नांवर कोणतीही प्रकाशझोत टाकली जात नाही, हे आश्चर्यकारक आहे. शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व काळात मंजूर झालेल्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे संशय आहे. आमचा उद्देश महापालिकेतील प्रत्येक निर्णयाची पारदर्शकता वाढवणे आणि जनतेच्या पैशाचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा आहे. म्हणूनच आम्ही माहितीचा अधिकाराचा उपयोग करून संपूर्ण तपशील मागत आहोत, ज्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ शकेल.”

– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button