बालघरे वस्तीमधील भैरवनाथ मंदिराच्या दानपेटीतील 70 हजार रुपये चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
बालघरे वस्ती चिखली येथील भैरवनाथ मंदिराच्या दानपेटीतील सुमारे 70 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आकाश नरहरी बालघरे (वय 23, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालघरे वस्ती येथील भैरवनाथ मंदिराची देखभाल फिर्यादी आकाश हे करतात. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिराच्या सभामंडपात ठेवलेल्या स्टीलच्या दानपेटीचे झाकण कट करून दानपेटीतील सुमारे 60 ते 70 हजार रुपये चोरट्याने चोरून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.