नियमित योग हाच आरोग्यदायी जीवनाचा पाया; सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांचे मत
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिखलीत मोफत शिबीर
पिंपरी : कोविड सारख्या महामारीच्या काळात ज्या नागरिकांनी योगसाधना केली. त्यामुळे अनेकांची रोगप्रतिकार शक्ती प्रभावी राहली. त्यामुळे योगसाधना करणाऱ्या नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आपण एकच दिवस योग दिन साजरा न करता नियमित योगसाधना केली पाहिजे. हाच आरोग्यदायी जीवनाचा पाया आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांनी व्यक्त केले.
जागतिक योग दिनानिमित्त भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विनायक आबा मोरे आणि सोनम मोरे यांच्या माध्यमातून चिखली येथे मोफत योगा प्राणायाम व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विनायक आबा मोरे म्हणाले की, योगसाधणेला हजारो वर्षांची परंपरा आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मन:शांती आणि निरोगी आरोग्यासाठी योगासने केली पाहिजेत. चिखली आणि परिसरातील नागरिकांना मोफत योग शिबीराद्वारे योगासनांचे धडे देण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. हा योग दिन केवळ एका दिवसासाठी नाही, तर नियमित साजरा केला पाहिजे.
सोनम मोरे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. योग हा आपल्या प्राचीन भारतीय परंपरेचा एक भाग आहे. भारताने मानवजातीला दिलेली ही देणगी आहे. आरोग्य आणि कल्याणासाठी एक समग्र दृष्टीकोन आहे. योग हा आपल्या जीवनाचा भाग असावा. ‘मानवतेसाठी योग’ही यावर्षीची संकल्पना आहे ती जनमानसात रुजली पाहिजे.