पिंपरी / चिंचवडपुणे

बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली सव्वा नऊ कोटींची खंडणी : उच्चशिक्षित आरोपी अटकेत

पिंपरी l प्रतिनिधी

बांधकाम साईटबाबत तक्रार करण्याची धमकी देत सव्वा नऊ कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने एका उच्च शिक्षित आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 27) दुपारी थेरगाव येथे करण्यात आली.

आदिनाथ भूजाबली कुचनुर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी केतुल भागचंद सोनिगरा (वय 41, रा. निगडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनिगरा यांची डांगे चौक थेरगाव येथे सिग्नेचर पार्क ही बांधकाम साईट सुरु आहे. या नवीन बांधकामाबाबत तक्रार करतो असे अरहाम आर ई कन्सल्टन्सी सर्विसेसचे आदिनाथ कुचनुर याने पत्राद्वारे कळविले. तसेच त्यात बांधकाम साईटच्या एकूण किमतीच्या 2.5 टक्के म्हणजेच 9.25 कोटी रुपये एवढी रक्कम देण्याची सोनिगरा यांच्याकडे मागणी केली. याबाबत सोनिगरा यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे तक्रार केली.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी खंडणी विरोधी पथकाला या तक्रारीची शहनिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तपास केला असता त्यात आदिनाथ कुचनुर याने यापूर्वी निवृत्त न्यायाधीशांची खोटी कागदपत्रे बनविणे, बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणे, महापालिकेच्या अधिका-यांवर खोटे आरोप करणे, आर्कीटेक्ट यांना बदनाम करणे असे प्रकार केले असून अशा कारणांसाठी त्याच्यावर हिंजवडी, पिंपरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी डांगे चौक थेरगाव येथील सिग्नेचर पार्क या बांधकाम साईटवर सापळा लावला. सिग्नेचर पार्क साईटवरील ऑफिसमध्ये आदिनाथ कुचनुर आला. त्याने खंडणीच्या रकमेतील 25 टक्के 2 कोटी रुपये रकमेचा चेक घेतला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 कोटी रुपयांचा चेक, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाशी निगडीत कागदपत्रे मिळून आली. त्यावरून कुचनुर याने पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, मुंबई येथील काही बांधकाम व्यावसायिकांना अशाच प्रकारे धमकावल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सोनिगरा यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कुचनुर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 1 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, विक्रमसिंग जगदाळे, गणेश मेदगे, किरण काटकर, शाम बाबा, विजय तेलेवार, आशिष बोटके, तौसिग शेख यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button