ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला मागितली खंडणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/dhamki-ransam.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
‘मला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर इथून तुमची एकही ट्रॅव्हल्स गाडी जाऊ देणार नाही’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत एकाने एका व्यावसायिकाला खंडणी मागितली. ही घटना एप्रिल 2022 मध्ये कृष्णानगर भाजी मंडई चौक आणि 15 मे 2022 रोजी कृष्णानगर चौकात चिखली येथे घडली.
अनुप लांबट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजू विलास बिराजदार (वय 50, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी सोमवारी (दि. 23) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रॅव्हल्स बुकिंगचा व्यवसाय आहे.एप्रिल 2022 मध्ये कृष्णानगर भाजी मंडई चौकात एका चहाच्या टपरीवर फिर्यादी आणि त्यांचा मुलगा थांबले असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला फोन केला. फोनवरून शिवीगाळ, दमदाटी करत बोलावून घेतले आणि ‘मला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर इथून तुमची एकही ट्रॅव्हल्स गाडी जाऊ देणार नाही’ अशी धमकी दिली.
फिर्यादी यांच्या मुलाला आरोपीने बाजूला नेऊन त्याच्या कमरेला हात लावला. ‘माझ्या जवळ पिस्तुल आहे. हप्ता दिला नाही तर मर्डर करून टाकेन’ अशी आरोपीने धमकी दिली.
त्यांनतर 15 मे रोजी फिर्यादी हे कृष्णानगर चौक चिखली येथे ट्रॅव्हल्स एजन्सीच्या टपरीवर असताना आरोपी तिथे आला. ‘मला हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील. नाहीतर जीवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली. यापूर्वी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला धमकीला घाबरून फिर्यादी यांनी आरोपीला पाच हजार रुपये खंडणी काढून दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.