शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे साजरा करा; संभाजी भिडेंची मोठी मागणी

पुणे | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. ६ जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद करून तो तिथीप्रमाणे, म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी साजरा करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो. त्याप्रमाणे शिवराज्याभिषक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली. आपण अजून ब्रिटिशांच्या प्रथेप्रमाणे तारखेनुसार उत्सव साजरा करतो. हे उत्सव तिथीप्रमाणे साजरे करावे. तसेच रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात येऊ नये, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
हेही वाचा : आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवा
पुण्यातील वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे यांनी हुंडा प्रथेवर कठोर टीका केली आहे. हुंडा देण्याची प्रथा पूर्णपणे बंद केली पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. समाजातील या कुप्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.